यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक सुविधा उभारण्याच्या उद्देशाने विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या विकास प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना सोयीस्कर बाजारपेठ, जलसुविधा आणि व्यापाराच्या दृष्टीने उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ राज्य सदस्य हिरालाल चौधरी, माजी सभापती नारायण चौधरी, माजी सभापती हर्षल पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील व प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, माजी पंचायत समिती सदस्य व परसाडे सरपंच मिना तडवी, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुकाध्यक्ष सागर कोळी, फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे, किनगाव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील, सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन नरेन्द्र नारखेडे, माजी नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, तसेच शिवसेना (शिंदे गट) नेते तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सभापती राकेश फेगडे यांनी समितीच्या विकास आराखड्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “सुमारे चाळीस लाख रुपयांच्या खर्चातून बाजार समिती परिसरात बाजार ओटे, जलसाठा व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. या कामांमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम वातावरण मिळेल.”
आमदार अमोल जावळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सभापती राकेश फेगडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या कार्याचा आणि शेतकरीहिताच्या निर्णयांचा आम्हाला अभिमान वाटतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि बाजार व्यवस्थेच्या मजबुतीसाठी ही कामे एक मोलाची पायरी ठरणार आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “यावल बाजार समितीच्या पुढाकारामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे व्यवहार अधिक पारदर्शक व सुलभ होतील.”
या भूमिपूजन सोहळ्याने यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास प्रवासात नवा अध्याय सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेले हे पाऊल स्थानिक कृषी व्यवस्थेला बळकट करणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उन्नतीसाठी ही कामे नवा आदर्श निर्माण करतील.



