Home पर्यावरण दहिगांव परिसरात बाजारतळ उभारणीला वेग

दहिगांव परिसरात बाजारतळ उभारणीला वेग

0
112

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगांव परिसर शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी आता बाजारतळ उभारणीच्या कामाला गती मिळाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, यावल यांच्या वतीने दहिगांव ते कोरपावली रस्त्यावर नव्या बाजारतळाच्या स्थळाची पाहणी करण्यात आली. या उपक्रमामुळे लवकरच येथे शेतमालाचे लिलाव सुरू होणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पाहणीदरम्यान यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश वसंत फेगडे, सचिव स्वप्नील सोनवणे, दहिगांवचे उपसरपंच देविदास धांगो पाटील, ग्रामपंचायत सदस्य भैय्यासाहेब पाटील, पी. डी. पाटील, मधुकर राजपुत यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजारतळासाठी शेतजमीन भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून, बाजार समितीने तातडीने मूलभूत सोयी-सुविधांच्या उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

या दरम्यान सभापती राकेश फेगडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. त्यांनी सांगितले की, “दहिगांव परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या विक्रीसाठी सोयीस्कर आणि पारदर्शक प्रणाली मिळावी, हा बाजारतळ उभारणीचा उद्देश आहे. येत्या काही दिवसांतच येथे नियमित लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल.”

पाहणीवेळी उपस्थित शेतकऱ्यांनी बाजारतळ उभारणीच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक बाजारात शेतमाल विक्रीसाठीची सुलभ व्यवस्था निर्माण झाल्यास उत्पादनवाढीस प्रोत्साहन मिळेल, असेही शेतकऱ्यांनी नमूद केले.

सभापती राकेश फेगडे यांनी शेतकरी बांधवांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “बाजार समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आली आहे. दहिगांव बाजारतळ हा त्याच ध्येयाचा पुढचा टप्पा आहे,” असे सांगितले.


Protected Content

Play sound