मुंबई प्रतिनिधी | कोरोनामुळे एमपीएससी परिक्षांमध्ये झालेला विलंब पाहता राज्य सरकारने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच सोबत स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे परिक्षा आणि परिक्षांचे निकाल रखडल्याने मध्यंतरी विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. अनेक शहरांमध्ये ऐन करोनाच्या संकटामध्ये एमपीएससीच्या परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. करोना काळात परीक्षा स्थगित केल्यामुळे या परीक्षा घेण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. मात्र, त्यानंतर करोनाचं संकट वाढल्यामुळे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या सगळ्या गोंधळामुळे परीक्षार्थींचं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षार्थींसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एमपीएससीच्या परीक्षार्थींना आता परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांनी अजून एक संधी मिळणार असून याचा लाखो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.