काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

vijay wadettiwar 759

मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी बढती मिळालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची अपेक्षेप्रमाणे विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपत प्रवेश करत त्यांनी मंत्रिपदही मिळवले आहे. यानंतर काँग्रेसने केलेल्या फेरबदलात विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

विजय वडेट्टीवार यांनीच लोकसभा निवडणुकीत राज्यातून एकमेव जागेवर पक्षाला विजय मिळवून देत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्याची नामुष्की टाळली. त्यानंतर विधान सभेतील उपनेते असलेले विजय वडेट्टीवार यांना अपेक्षेप्रमाणे बक्षीस मिळाले. विधानसभा गटनेतेपदी त्यांची बढती झाली आहे.

विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील फेरबदलाचे आदेश जारी केले होते. त्यानंतर दोन्ही सभागृहाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. सभागृहातील उपनेते असल्याने विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यानुसारच पक्षाने त्यांना गटनेता केले होते. आज त्यांच्याच नावाची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा करण्यात आली.

Protected Content