Home राजकीय राहुल गांधी यांच्या निर्णयाने काँग्रेसमध्ये माजली बंडाळी

राहुल गांधी यांच्या निर्णयाने काँग्रेसमध्ये माजली बंडाळी

rahulgandhi 1556003189

rahulgandhi 1556003189

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिलेल्या राजीनाम्याच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अजूनही ठाम आहेत. राहुल यांच्या या पवित्र्यांमुळे देशातील विविध राज्यांमधील प्रदेश काँग्रेसमध्ये जोरदार वाद निर्माण झाले असून दुफळी माजली आहे. येत्या काही दिवसात राहुल यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर स्थिती अधिक बिकट होईल. जागोजागी स्थानिक नेत्यांचे गट वर्चस्वासाठी हातघाईवर येतील, अशी चिंता पक्षातील काही ज्येष्ठ व सुज्ञ नेत्यांना सतावू लागली आहे.

 

ही कोंडी फोडण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी पुढाकार घेतला आहे. राहुल गांधी यांनी राजीनाम्यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आता संपवली पाहिजे, असे जाहीर वक्तव्य मोईली यांनी केले आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी याबाबत विचार करावा, असेही मोईली म्हणाले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम राहून देशातील प्रदेश काँग्रेसमध्ये निर्माण झालेले कलह मिटवावेत, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

राहुल गांधी आता निर्णय घ्यायला हवा असा निर्वाणीचा सल्ला मोईली यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची ही वेळ नाही. इंदिरा गांधी यांना देखील १९७७ मध्ये अशाच राजकीय स्थितीचा सामना करावा लागला होता, परंतु त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला असे मोईली म्हणाले. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेत देशभरातील प्रदेश काँग्रेसमधील वाद मिटवून पक्षाला दिशा द्यायला हवी, असे मोईली बोलताना म्हणाले.

हरयाणात दुफळी :– काही दिवसांपासून हरयाणा राज्यातील प्रदेश काँग्रेसमधील मतभेद उफाळून येऊ लागले आहेत. हरयाणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोत तंवर यांनी पदावरून हटवावे, अशी थेट मागणीच हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांनी केली आहे. तर हुड्डा विरोधी गटाने ही मागणी फेटाळत हुड्डांवरच हल्लाबोल केला आहे. हुड्डा आणि त्यांचे पुत्र जाटबहुल मतदारसंघातही पराभूत झाले, असे हुड्डाविरोधकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र दिशाहीन :- महाराष्ट्रातही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही पक्षात विरोधाचा सामना करावा लागत आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रात चव्हाणांसाठी काँग्रेसला पर्याय सापडत नाही. राज्यातील काही मोठ्या मराठा नेत्यांनी भाजपत प्रवेश केला आहे आणि काही आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.

कर्नाटकातले ‘नाटक’ :- कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे संयुक्त सरकार आहे. मात्र, इथे २८ पैकी २५ जागांवर विजय संपादन करत भाजपने आघाडीलाच आव्हान दिले आहे. काँग्रेस आणि जेडीएसला प्रत्येकी एक जागेवरच समाधान मानावे लागले आहे. कर्नाटकात स्थिती खालावल्यामुळे काँग्रेस काही अपक्षांना महत्त्वाची खाती देण्याच्या विचारात आहे.

पंजाबात संघर्ष :- काँग्रेसने पंजाबात १३ पैकी ८ जागांवर विजय संपादन केला आहे. असे असतानाही मुख्यमंत्री कॅप्टन अमरेद्र सिंह यांनी सिद्धू यांच्यावर टीका करणे सोडलेले नाही. अमरेंद्र सिंह यांनी सिद्धू यांचे खातेही बदलले. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याच्या गळाभेटीमुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, अशा शब्दात अमरेंद्र सिंह यांनी सिद्धूंवर टीकास्त्र सोडले आहे.

मध्यप्रदेश अधांतरी :- मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर निवडणूक निधीशी संबंधित एका प्रकरणात आयकर विभागाने छापे टाकले. यामुळे मध्य प्रदेश सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इथे २९ जागांपैकी २८ जागांवर भाजपचा विजय झाला आहे. भोपाळ लोकसभा जागेवरून ३५०००० मतांनी दिग्विजय सिंह यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे मध्य प्रदेशात पक्षाचे मनोबल खच्ची झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound