चंदिगड (वृत्तसंस्था) काँग्रेस प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी यांची फरिदाबादमध्ये दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. चौधरी यांच्यावर सेक्टर-9 मध्ये हल्लेखोरांनी 5-6 गोळ्या झाडल्या. चौधरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत मात्र, त्यांचा मृत्यू झालेला होता.
चौधरी हे आपल्या गाडीतून जिमला जात असताना दोघं हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे. सकाळी नऊच्या सुमारास विकास चौधरी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सेक्टर-9 मध्ये असलेल्या हुडा बाजारातील जिममध्ये जाण्यासाठी चौधरी गाडीतून उतरताच हल्लेखोरांनी जोरदार गोळीबार सुरू केला. त्यांनी 5-6 राऊंड फायर केले. यामध्ये चौधरी गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, भरदिवसा झालेल्या हत्येमुळे फरिदाबादमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. सध्या पोलिसांकडून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हींचे फुटेज तपासण्याच काम सुरु आहे.