मुंबई । काँगेंसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. यावर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय मला विचारून घेतलेला नाही. तो त्याचा वैयक्तीक निर्णय होता. पण विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार मी करणार नाही असेही यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोजित पत्रपरिषदेत महिती दिली.
सुजय विखे यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं पक्षांतर्गत विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुलाच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयापासून हात झटकले. सुजय भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेसची आडमुठी भूमिका जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने सुजयसाठी सोडावा, असा विखे पाटील यांचा आग्रह होता. मात्र, राष्ट्रवादीने त्यास ठाम नकार दिला. उलट दुसऱ्यांच्या मुलांचे हट्ट आम्ही का पुरवू, असे पवार यांनी सुनावलं होते. पवार यांच्या या वक्तव्याबद्दल व राष्ट्रवादीच्या एकूण भूमिकेबद्दल विखेंनी संताप व्यक्त केला.
‘नगरच्या जागेबाबत दोन्ही पक्षांमध्ये अनेकदा चर्चा झाली होती. सतत पराभव झालेल्या जागांची अदलाबदल व्हावी असं आमचं म्हणणं होतं. त्या निकषावरच आम्ही नगरची जागा मागितली होती. मात्र, जिल्ह्यातील दोन्ही जागा काँग्रेसकडं देण्यास राष्ट्रवादीचा विरोध होता. खरंतर नाशिक, औरंगाबादमध्ये दोन्ही जागा राष्ट्रवादीकडं आहेत. त्यामुळं एकाच पक्षाकडं जागा गेल्या असत्या तर काही फरक पडणार नव्हता. उलट आघाडीचा एक खासदार वाढला असता,’ असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही!
नगर दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असं विखे यांनी यावेळी सांगितलं. ‘आघाडीच्या धर्माला गालबोट लागेल असं वक्तव्य मी आजवर कधीच केलेलं नाही. मात्र, शरद पवारांनी मधल्या काळात विखे कुटुंबावर वैयक्तिक टीका-टिप्पणी केली. माझ्या हयात नसलेल्या वडिलांबद्दलही ते बोलले. त्यांच्या मनात आमच्या कुटुंबाबद्दल प्रचंड द्वेष आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असं ते म्हणाले. सुजयचा प्रचारही करणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.