धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या प्रलंबित व विविध मागण्यासाठी धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता धरणगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कृषी कर्ज बिनव्याजी दिले होते ते शिंदे फडणवीस सरकारने रद्द केले आहे. त्यामुळे हे बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांनी मिळावे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान तातडीने देण्यात यावे, अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अमळनेर तालुक्यातील पाटण सारे धरण पूर्ण झाल्यास धरणगाव तालुक्यातील शेती ओलीताखाली येण्यास हातभार लागणार आहे, त्यामुळे धरणाचे काम तातडीने पूर्ण करावे. धरणगाव तालुक्यात दुष्काळस्थिती असून देखील पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पिक विमा देत नाहीत तो तातडीने देण्यात यावा. तसेच एसटी प्रवर्गातील भिल्ल समुदायाला स्वस्त धान्य दुकानातून तातडीने धान्य देण्यात यावे, यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता धरणगाव शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून ते धरणगाव तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ. व्हि. डी. पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.