मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसनेदेखील सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला मदत करणार असल्याचे वृत्त आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीत जाऊन पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार असल्याचे शरद पवारांनी याआधीच स्पष्ट केले असले तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या एक गटाची शिवसेनेसोबत हातमिळवणी करुन सत्तास्थापन करण्याची इच्छा आहे. च्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी आघडीच्या नेत्यांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीला दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीतदेखील काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. तर शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसने आधी स्वतःची ठाम भूमिका ठरवावी, असे मत शरद पवारांनी बैठकीत मांडल्याचे कळते. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत भूमिका ठरवावी, असा सल्ला शरद पवारांनी दिल्यानंतर याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. ही भेट ठरल्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.