जळगाव प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पिडीतेला न्याय द्यावा आणि योगी सरकार बरखास्त करावी या मागणीसाठी आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जळगाव रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलीत समाजातील मुलीवर अत्याचार करून अमानवी हाल करण्यात आले. या घटनेने संपुर्ण देश हादरला असून संतापाची लाट उसळली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील सरकारने या घटनेची गंभीरतेने दखल घेण्याची गरज होती. मात्र, केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद आहे. आज हाथरसमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना येऊ दिले जात नाहीये. पीडितेच्या कुटुंबीयांना डांबून ठेवले आहे. प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचू दिले जात नाही. सत्य दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या घटनेबाबत बोलायला तयार नाहीत. हेच रामराज्य आहे का? हिंदुत्व मिरवणाऱ्या भाजपचा खोटा चेहरा समोर आला आहे.
पीडीतेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेले खासदार राहुल गांधी व अखिल भारतीय कमेटीचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करत अत्यांत हिन पातळीचा व्यवहार करीत त्यांनी अटक करण्यात आली. विरोधी पक्षांच्या नेत्यांचा अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचा लोकशाहीने दिलेला हक्क पायदळी तुटविण्यात आला आहे. योगी सरकारने या मनमानी कृत्याचा निषेध करण्यात आला. यासाठी पिडीतेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून कडक शासन व्हावे, योगी सरकार बरखास्त करावी अशी मागणी जळगाव जिल्हा महानगर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. यामागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हा सचिव डी.जी.पाटील, श्यामकांत तायडे, प्रा.हितेश पाटील, मुजीम पटेल, वासूदेव महाजन, योगेश देशमुख, जगदीश गाढे, जाकीर बामधाना, योगेश महाजन, योगिता शुक्ल, छाया कोरडे, ममीता तडवी, अनिसा पटेल, विष्णू घोडेस्वार, किशोर सुर्यवंशी, राजद कोतवाल, चंदन पाटील, बाबा देशमुख, देवेंद्र मराठे, ज्ञानेश्वर कोळी, विजय वाणी, महेंद्र पाटील, श्रीधर चौधरी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.