खामगांव, प्रतिनिधी । स्थानिक सुप्रसिध्द अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल यांच्या ‘अग्रवाल हॉस्पिटल’, नांदुरा रोड येथे नुकतीच एका जवानाची गुडघ्याची जटील व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
घाटपूरी रोड येथील मनोज मनोहरसिंह पवार (वय – 36) हे हिंगोली येथे एस. आर. पी. एफ. जवान म्हणून कर्यरत आहेत. यांचा 1 महिन्यापूर्वी ट्रेनिंग करतांना गुडघा मुरगळला होता. त्यामुळे त्यांच्या गुडघ्याची गादी (मेनीस्कस) व ए. सी. एल. लीगामेंट फाटले होते. त्यांना चालतांना अत्यंत वेदना व त्रास होत होता. त्यानंतर त्यांनी डॉ. नितीश अग्रवाल यांच्याजवळ तपासणी केली. संपूर्ण तपासणीनंतर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. त्यानुसार दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या गादीची व लीगामेंटची जटील आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. रुग्णाला ४ दिवसातच सुट्टी देण्यात आली. यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्यामुळे रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांनी आनंद व्यक्त करुन डॉक्टरांचे आभार मानले.
रुग्णाचे वडिल मनोहरसिंह पवार यांनी खामगाव शहरात अनेक वर्ष पोलीस विभागात सेवा देऊन आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत. डॉ. नितीश यांनी ऑस्ट्रेलिया येथून अस्थिविकारावर अत्याधुनीक तंत्रज्ञानाने उपचार करण्याची पध्दती शिकून आलेले असल्याने आणि नाशिक व मुंबई येथील नामांकीत हॉस्पिटल्समध्ये १ हजाराच्या वर गुडघाबदली व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे अनुभव घेतलेले असल्यामुळे ही जटील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. अस्थिरुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याचा त्रास होऊ नये आणि रुग्णसेवा घडावी या उद्देशाने माफक दरामध्ये सेवा देण्याचा मानस यावेळी डॉ. नितीश अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.