राज्यात ६५ ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी

evm1

मुंबई, वृत्तसंस्था | राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.२१) सकाळी ७.०० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारींच्या नोंदवल्या गेल्या आहेत. या परिस्थितीमुळे मतदानाचा खोळंबा झाला, तर अनेक ठिकाणी मतदान उशिराने सुरू झाले. अजूनही अशा प्रकारच्या तक्रारी येत असून या स्थितीची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम बिघाडाच्या एकूण ६५ लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.

 

आज सकाळी ७.०० वाजता मतदान सुरू झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात तीन मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. पैठण तालुक्यातील टाकळी अंबड, वाहेगाव आणि वैजापूर तालुक्यातील हिंगोणी मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाला. या मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे मतदानाचे काम काही तास बंद होते.

सिंदखेड राजा मतदारसंघातीळ देऊळगांव राजा बुथ क्र. २०५ मध्ये मतदान सुरू होण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे येथील मतदान केद्रांवर तासाभर उशिराने मतदान सुरु झाले. या मतदान केंद्रावरील ईव्हीएम एक तास चार मिनिटे बंद होती. त्यानंतर इथे ८ वाजून ०४ मिनिटांनी मतदान सुरु झाले. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील बूथ क्रमांक २१९ मध्ये VVPAT मशीन काम करत नव्हते. त्यामुळे या केंद्रावरील मतदानही बंद पडले होते. दरम्यानच्या काळात इथे पावसाच्या सरीही बरसत होत्या. त्यामुळे मतदार पावसामुळे त्रस्त झाले होते. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या बरोबरच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्येही एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील हे केंद्र आहे. याबरोबरच इस्लामपूर मतदारसंघातील साखराळे गावातील मतदान केंद्र क्रमांक ६३ वरही ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. हा बिघाड सुमारे अर्ध्यातासानंतर दुरुस्त होऊ शकलेला नव्हता.

चाळीसगाव तालुक्यातील वलठान येथील मतदान केंद्र क्रमांक ३१० मधील ईव्हीएम बंद पडल्याची घटना घडली.वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात मोहगाव येथील बुथ क्रमांक ५० वरील ईव्हीएम मशिन बंद पडले होते. या मुळे मतदारांची चांगलीच गैरसोय झाली. यामुळे येथे मतदारांची मतदान केंद्राबाहेर रांग लागली होती. त्यानंतर बंद पडलेली मशीन बदलण्यासाठी आयोगाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या बरोबरच हिंगणघाट मतदारसंघात मॉक पोलच्या वेळी सहा मशीनच्या व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्यानंतर या सर्व मशीन तातडीने बदलण्यात आल्या.

Protected Content