यावल (प्रतिनिधी) यावल, चोपडा व रावेर या सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या तिन्ही तालुक्यात हॉटेल, बिअर बार व दारूच्या दुकानात सर्रास नकली दारूची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार मद्यपींनी केली आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणावे, अशीही मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, जिल्ह्यातील चोपडा, यावल, आणि रावेर हे तालुके आदिवासी क्षेत्र म्हणुन ओळखले जातात या तालुक्यांना चोपडा तालुक्यास गुजरात व मध्यप्रदेश ही दोन राज्ये जोडलेली आहेत. यावल आणी रावेर तालुके मध्य प्रदेशच्या सिमेवरचे तालुके आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असुन, या निमित्त स्नेहभोजनाच्या ओल्या पार्ट्याही रंगु लागल्या आहेत. निवडणुकीच्या या गोंधळात काही परप्रांतीय दारू तस्कर या संधीचा फायदा घेत मोठमोठया ब्रॅन्डेड कंपन्यांची बनावट दारू तयार करून गुपचूप महाराष्ट्राच्या हद्दीत आणत असल्याचे निदेर्षनास आले आहे. तसेच ठिकठिकाणी अतिशय शिताफीने ही दारू बिअर बार व हॉटेल्स अशा ठिकाणी पुरवठा करीत आहेत.
घातक अशा रसायनव्दारे तयार केलेली ही दारू मद्य शौकीनांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे बोलले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ या विषयी चौकशी करून जर खरोखर परप्रांतातुन बनावट महागडी दारू विक्रीसाठी आणली जात असेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून या प्रकाराला प्रतिबंध घालावा. यामुळे होणारे महसुलाचे नुकसान टाळावे व नागरिकांच्या आरोग्याची हानी वाचवावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.