भुसावळात महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात तक्रार

lait bil

 

भुसावळ प्रतिनिधी । शहरात वीज बिलांबाबत ग्राहकांच्या सातत्याने तक्रारी वाढत आहेत. त्याच ग्राहकाच्या तक्रारी दर महिन्याला येत असून लाईट बिलात असंख्य चुका निदर्शनास आलेल्या असून महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना प्रा. सीमा पाटील यांच्यातर्फे आज लेखी तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक पातळीवर वारंवार होणाऱ्या चुका महावितरणच्या प्रमुख अधिकाऱ्यांचे ग्राहकांसोबत होणारे गैरवर्तन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मुख्य अभियंता दिपक कुमठेकर व स्थानिक पातळीवर रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरच्या बाबतीत वारंवार तक्रार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. जळगाव रोड परिसरातील भोई नगर, श्री नगर, हुडको कॉलनी, गणेश कॉलनी, विद्या नगर, खैळवाडी, काशीराम नगर, रेल दुनिया, अयोध्या नगर भागातील ग्राहकांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराची तक्रार प्रा. सीमा पाटील यांच्याकडे केली. बुधवारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना प्रा. सीमा पाटील यांच्यातर्फे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.

समायोजित युनिटच्या नावावर लूट-

श्रीनगर येथील रमेश सपकाळे यांना सप्टेंबर महिन्याचे 2 लाख 97 हजार रुपयांचे देयक दिले गेले. त्यांना देयक बघून मनस्ताप झाला. भोई नगर सारख्या गरीब वस्तीत राहणाऱ्या गिरीधर भोई यांना 47 हजार 150 रूपयांचे बिल काहींना तर काहींना 13 हजार आणि 8 हजार अशी लाईट बिल देण्यात येत आहे.

तक्रार करणाऱ्यांना अधिक त्रास

वेडी माता मंदिराजवळील सुरेश पाटील मागील तीन महिन्यापासून सतत चुकीच्या देयकाची तक्रार करीत आहेत, दुरुस्ती झाल्यानंतर परत या महिन्यात तीच चुकी निदर्शनास आणून द्यावी लागते, प्रत्यक्ष भेट देण्यासाठी एका दिवशीची सुटी घ्यावी, असे ग्राहकाने बोलून दाखवले. सुमन कोलते यांना मागील सहा महिन्यांत सरासरी देयके व नंतर नादुरुस्त मीटरचे देयक मिळाले. त्यांनी सुद्धा सलग तक्रारी केल्या म्हणून या महिन्यात त्यांना 7 हजार रुपयांचे देयक पाठवले आहे.

उशिरा दिलेल्या देयकामुळे महावितरणला 5 कोटीचा फायदा

नियमानुसार देयकांचा तारखेनंतर पाच दिवसाच्या आत ग्राहकांना वीज देयके मिळाली पाहिजे. परंतु 18 तारखेला तयार झालेले देयक 25 तारखेला ग्राहकांना मिळाली. 27 तारखेपर्यंत देयक भरणा सूट मिळेल. उशिरा मिळालेल्या देयकामुळे महावितरणला या महिन्यात 5 कोटी रुपयांचे उत्पन्न होईल व ग्राहकांचे नुकसान झाले आहे.  या सर्व तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात अन्यथा ग्राहकांचा रोषाला सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे.

Protected Content