धरणगावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव व विक्रम ग्रंथालय व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रेल्वे डी ग्रुप, तिकीट कलेक्टर (TC), FSSI, CRPF आणि FCI या परीक्षांसाठी विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एकूण 1 लाख 3000 जागांच्या भरतीच्या संधींबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रा. आर. एन. महाजन (अध्यक्ष, विक्रम ग्रंथालय व वाचनालय, धरणगाव), तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, संतोष पवार (API, धरणगाव पोलीस स्टेशन), दिनेश पाटील (STI, खेडी, ता. अमळनेर), चिंतामणजी पाटील (उपाध्यक्ष, विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था, धरणगाव), स्टेशन मॅनेजर श्री किर्तीवंत जगताप (जळगाव), स्टेशन मॅनेजर विजय पाटील (पाचोरा) आणि समाधान महाजन (CISF अधिकारी, IGI इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिल्ली) आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रा. आर. एन. महाजन होते. त्यांनी वाचनाचे महत्त्व, सामाजिक दबाव व डिप्रेशनच्या समस्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी अभ्यास कसा करावा व टाईम मॅनेजमेंटचे महत्त्व यावर सखोल चर्चा केली. एपीआय संतोष पवार यांनी चालू घडामोडी, इतिहास आणि ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून अधिक ज्ञान कसे संपादन करावे हे सांगितले. एसटीआय दिनेश पाटील यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाचा अनुभव सांगून, प्रतिकूल परिस्थितीतही अभ्यास कसा करावा याविषयी प्रेरणादायी विचार मांडले. स्टेशन मॅनेजर विजय पाटील (पाचोरा) आणि किर्तीवंत जगताप (जळगाव) यांनी रेल्वे भरती प्रक्रियेचे विविध पैलू उलगडून सांगितले. त्यांनी परीक्षा तयारी, नोटिफिकेशन, निकाल प्रक्रिया आणि रेल्वेतील करिअर संधी याविषयी मार्गदर्शन केले.

सीआयएसएफ अधिकारी समाधान महाजन यांनी गणित विषयाची भीती कशी दूर करावी, राज्य व केंद्र सरकारच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमातील फरक आणि त्यानुसार तयारी कशी करावी यावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी तिरंगा अकॅडमी (धरणगाव) मार्फत 15-20 विद्यार्थी बीएसएफ, सीआरपीएफआणि आर्मीमध्ये निवड झाल्याची माहिती दिली. खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले विविध पुस्तक संच विक्रम वाचनालयास भेट देण्यात आले.या मार्गदर्शन शिबिरात धरणगाव व परिसरातील 200 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक जैन (खजिनदार, खान्देश प्रवासी असोसिएशन, झेड आर यू सी सी मेंबर, पश्चिम रेल्वे, मुंबई) यांनी केले. आभार प्रदर्शन खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष श्री कमलेश तिवारी यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी खान्देश प्रवासी असोसिएशनचे सचिव श्रेयास जैन, सहसचिव ऍड. नंदन पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सदस्य नारायणजी महाजन, प्रशांतजी भाटिया, दिनेश भाऊ पाटील, कन्हैया रायपुरकर, संभाजी सोनवणे, जतिनजी नगारीया यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक व व्यवस्थापक भगवानजी कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Protected Content