९० वर्षीय गोदावरी आजींकडून डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांना पदवी बहाल
जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । होमिओपॅथी ही अशी पॅथी आहे ज्याची उपचारपद्धती फार वेगळी आहे. प्रत्येक आजार आणि रुग्णानुसार त्यावर उपचार यात फरक असतो. त्यामुळे जरी आज तुम्ही डॉक्टर झाला असला तरी नेहमी शिकत राहा, वाचन करुन ज्ञानात भर घाला. ज्यावेळेस तुम्ही रुग्णाशी सुसंवाद साधाला, त्याची जास्तीत जास्त माहिती जाणून घ्याल, अचूक निदानाबरोबरच खात्रीशीर उपचार कराल आणि त्यातून रुग्ण ज्यावेळी बरा होईल, तेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून यशस्वी व्हाल, असा मोलाचा सल्ला माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी दिला.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालयाचा ग्रॅज्युएशन सेरेमनी सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी आयोजित केला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांना डॉ.उल्हास पाटील यांनी संबोधित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत आदरणीय गोदावरी आजी ह्या होत्या. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.बी.पाटील, डॉ.अमोल चोपडे, डॉ.पंकज शर्मा आदि उपस्थीत होते. यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची प्रार्थना व राष्ट्रगीताने कार्यक्रमास सुरुवात केली. तद्नंतर मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.डी.बी.पाटील यांनी केले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर यांनी नेहमी वाचन करा, रुग्णसेवा करा, समाजात नाव कमवा, असे आवाहन केले. या कार्यक्रमात ६६ डॉक्टरांना पदवी बहाल करण्यात आल्यात.
पणजीकडून पदव्या बहाल
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, गोदावरी आई ह्या आज ९० वर्षाच्या असून त्या देखील शिक्षीका व मुख्याध्यापिका त्या काळी होत्या. पहाटे ४ वाजेपासून कंदिलाच्या उजेडात त्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवित असत. त्यांच्या हाताखालून हजारो विद्यार्थी घडले आणि उच्च पदावर काम करुन रिटायर्डही झालेत. त्यामुळे आज गोदावरी आईचे येथे असणे म्हणजे प्रत्यक्षात ‘पणजी’ चा आशिर्वाद तुम्हाला पदवीच्या रुपात प्राप्त झाला आहे. पुढे त्यांनी नशिबाचे चार प्रकार सांगितले असून त्यात ऑपरच्युनिटी लक बद्दल सांगितले की, मिळालेल्या संधीच सोनं करा, कठोर मेहनत घ्या, कामाप्रती निष्ठा जोपासा, दर दिवसाच नियोजन करुन आजच काम आजच पूर्ण करा आणि डॉक्टर क्षेत्रात व्यावसाय करीत असतांना वृत्ती चांगली ठेवा, असे आवाहनही डॉ.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवेश व श्रद्धा यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.