जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात राज्य सरकारने अनेक महत्वाची कामे केली असून सर्वसामान्यांना दिलासा देणार्या योजनांचे यशस्वी कार्यान्वयन केले आहे. याबाबतची माहिती शिवसैनिकांनी जनतेपर्यंत पोहचवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. निलम गोर्हे यांनी केले. त्या अजिंठा विश्रामगृहात शिवसंपर्क अभियानाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या.
डॉ. निलम गोर्हे म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात मी जवळपास ४० व्हिडीओ कॉन्फरन्सेस घेतल्या. मात्र स्थानिक पातळीवरील काही माहिती जाणून घेणे बाकी होते. विशेष करून शिवसेना भवनातून सर्व संघटनात्मक कामकाजांची माहिती घेतली जाते. तथापि, कोरोना काळातील काही माहिती जाणून घेण्यासाठी आपण हा दौरा करत आहोत. गेल्या ५५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आपल्या माध्यमातून एका महिलेला संधी मिळाली असून याच्या जोडीला उध्दवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असल्याचा आनंद काही औरच असल्याचे डॉ. गोर्हे म्हणाल्या.
डॉ. निलम गोर्हे पुढे म्हणाल्या की, जळगाव जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आपल्याकडे समर्थ नेतृत्व आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची साथ मिळत नाही. विशेष करून जिल्हा परिषद ही भाजपच्या ताब्यात असल्याने तेथे कामांची अडचण होते. यामुळे जिल्हा परिषदेचे गट असो की, पंचायत समितीचे गण शासन आणि प्रशासन हे आपल्या माध्यमातून पोहचले पाहिजे अशी अपेक्षा डॉ. निलम गोर्हे यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारने कोरोनाच्या काळात विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे काम केले आहे. जळगाव जिल्ह्यात यासाठी ६८ कोटी रूपयांची तरतूद करून त्याचे थेट वाटप हे लाभार्थ्यांना झालेले आहे. ही माहिती शिवसैनिक आणि पदाधिकार्यांनी जनतेपर्यंत परिणामकारक पध्दतीत पोहचवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. निलम गोर्हे यांनी याप्रसंगी केले.
विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. निलम गोर्हे यांनी जिल्हा दौर्यात शिवसंपर्क अभियानाची बैठक घेतली. या आढावा बैठकीत
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाची यशस्वी अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यात तीन लाख शिवसैनिकांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट असून यासाठी शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला आघाडी यांनी झटून कामाला लागावे. आपण आज शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही भूमिका पार पाडत आहोत. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केल्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झालेला आहे. यामुळे सर्वांनी मुख्यमंत्र्यांचा आदर्श समोर ठेवावा. बोर्ड हीच शिवसेनेची ओळख राहणार असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. पक्षाशी गद्दारी करणारा हा मातेशी बेईमानी करणार असतो. यामुळे प्रत्येकाने पक्षाला आई समजून काम करावे. अगदी उद्या निवडणुका होणार आहे असे समजून प्रत्येकाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. तर जळगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो भविष्यातही कायम राहणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.