नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा| निवडणूक आयोगाने देशात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यासोबतच आयोगाने आदर्श आचारसंहिता ही लागू केली आहे. पण देशातील अनेक लोकांना व्हॉट्सॲपवरून ‘विकसित भारत’ नावाचा संदेश पाठवला जात आहे. या जाहिरातीतून भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार सध्या पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांचा मोदीची गॅरटी आणि मोदीनी केलेल्या कामाची माहिती एका पीडीएफ फाईल स्वरूपात पाठवली जात आहे.
सध्या आचारसंहिता लागू असली तरी देखील या जाहिराती व्हॉट्सॲपव्दारे लोकांना पाठवल्या जात आहे. अशा अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयोगाने या ‘विकसित भारत’च्या जाहिराती व्हॉट्सॲपवरून पाठवणे बंद करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहे. मंत्रालयाने आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटले की, हे संदेश आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठविण्यात आले होते, परंतु नागरिकांच्या सिस्टम आणि नेटवर्क समस्यांमुळे ते उशिरा पोहोचले असतील.