मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सरन्यायाधिशांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्कार झाल्याच्या प्रकरणावरून ज्येष्ठ विधीज्ज्ञ उज्वल निकम यांनी भाष्य करत हा प्रकार गैर नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, देशाचे सरन्यायाधिश उदय लळीत यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने वाद सुरू झाले आहेत. शिंदे यांच्याशी संबंधीत महत्वाच्या याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी आल्या असतांना हा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरून सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात ट्रोलींग होत आहे.
या सर्व प्रकारावर ज्येष्ठ विधीज्ज्ञ उज्वल निकम यांनी टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना भाष्य केले आहे. ते म्हणाले की, सरन्यायाधीश राज्यात आल्यानंतर अनेकदा मुख्यमंत्री त्यांच्या सत्काराला उपस्थित राहिले आहेत. तो एक प्रघात आहे. यामुळे या प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे उज्वल निकम यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. या सत्काराचा चुकीचा अर्थ लाऊ नका असेही त्यांनी नमूद केले.