
सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रोझोदा या जागृत तीर्थक्षेत्रात येत्या रविवारी (२६ ऑक्टोबर) रोजी एक साहित्यिक सोहळा रंगणार आहे. प्रसिद्ध हास्यकवी आणि महाराष्ट्राचे हास्यसम्राट अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य पुस्तक प्रकाशन व कवी संमेलन सोहळा होणार असून, साहित्यरसिकांसाठी हा एक आनंदाचा उत्सव ठरणार आहे.

या सोहळ्याचे आयोजन श्रीराम मंदिर व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने तसेच स्थानिक लेखक राजेंद्र तुळशीराम चौधरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. यावेळी चौधरी यांच्या दोन साहित्यकृती ‘दिवा तुळशीरामाचा’ (कविता संग्रह) आणि ‘ज्ञानधारा’ (लेख संग्रह) या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. तसेच जागृत तीर्थक्षेत्र श्री कामसिद्ध महाराजांच्या ‘आख्यायिका पुस्तिके’चेही प्रकाशन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम रविवारी (२६ ऑक्टोबर ) रोजी सकाळी दहा वाजता रोझोदा येथील श्री कामसिद्ध मंदिर सभामंडपात पार पडणार आहे. प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष व महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज आणि मुंबई प्रियदर्शनी शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आशीर्वाद जयवंत लोखंडे हे प्रकाशनकर्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास ज्येष्ठ व्याख्याते प्रा. व. पु. होले, ज्येष्ठ कवी डॉ. अतुल सरोदे, संदीप कसाळकर, लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश महाजन, श्रीराम व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन आणि साप्ताहिक कृष्णा पाटील यांसारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी एक रंगतदार कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून, यात डॉ. अतुल सरोदे (सावदा), राजेंद्र चौधरी (रोझोदा), रजनी निकाळजे (मिरा रोड), स्वाती शृंगारपूरे (बोरीवली), आर. बी. सोनवणे (जळगाव), विजय लुल्हे (जळगाव), संतोष मोहिते (मुंबई) आणि पी. के. पाटील (रावेर) हे कवी आपली काव्यरचना सादर करणार आहेत.



