आरोग्य विभागाला 20 जून पर्यंत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासून जिथे पिण्या योग्य पाणी नाही तिथे पर्यायी स्रोत निर्माण करून देण्याच्या सूचनेबरोबर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे मुबलक प्रमाणात टी सी एल गोळ्याचा उपलब्ध करून ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिल्या. आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. अधिकारी वेवोतोलु केजो, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिव्याख्याता डॉ. गिरीश ठाकूर, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश चौधरी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी जयवंत मोरे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पिण्याचे पाणी स्वच्छ असल्याची खात्री आरोग्य विभागाने करावी आणि तसा अहवाल 20 जून पर्यंत जिल्हाधिकरी कार्यालयात द्यावा अशा सूचना देऊन चाळीसगाव तालुक्यातील चार ठिकाणचे पाण्याचे स्रोत, जामनेर तालुक्यातील लिहा, भुसावळ तालुक्यातील दर्यापूर, जळगाव, धरणगाव, चोपडा, यावल तालुक्यातील कासवा आणि गारखेडा, रावेर, एरंडोल असे एकूण 35 ठिकाणच्या पाण्याला यल्लो कार्ड दर्जा असून एरंडोल मध्ये एक आणि रावेर मध्ये एक ठिकाणचा पाण्याला रेड कार्ड दर्जा आहे. यावर तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात टी सी एल गोळीचा, ओ आर एस, योग्य तो पुरवठा आहे का याची खात्री करून घ्यावी. जिल्ह्यात एकही डायरीयामुळे मृत्यू होणार नाही याची काळजी आरोग्य यंत्रणेतील अगदी शेवटच्या घटकापर्यंत सर्वानी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.तसेच ‘आशा ‘ साठी एक स्पेशल पत्र लिहून त्यांना गावोगावी,शाळेत विद्यार्थ्यांना, घरोघरी जाऊन लोकांना हात धुण्यापासून ते उकळून पाणी पिण्यापर्यंतचे सांगावे. बांधकामाच्या ठिकाणी, रस्त्यावर उघड्यावर असलेल्या बालकांच्या आरोग्याबाबत अधिक दक्ष राहण्याची सूचना संबधितांना देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.पावसाळी आरोग्यासाठी सर्वानी पालकसभा आयोजित करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आपला दवाखाना यात सुधारणा करण्याची गरज असून त्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून वेवोतोलु केजो ( आय. ए. एस) यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच जुना खोकला असलेल्यांची पुनर्रतपासणी, टी. बी. तपासणी करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गेल्या सात वर्षातील डेंगू, मलेरिया, टी. बी, याचा योग्य तो अभ्यास करावा आणि पुढील तपासणीसाठी याचा उपयोग करून घ्यावा. या कार्यवाहीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

Protected Content