धरणगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज धरणगाव तालुक्यातील भोणे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. युवराज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना ‘उभारी’ देण्याचा प्रयत्न केला.
नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेतून नाशिक विभागात आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबासाठी उभारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत महसूल विभागातील अधिकारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेट देतात व त्या कुटुंबाचे अडीअडचणी समजून घेतात त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी माहिती जाणून घेऊन त्यांना प्राधान्याने योजनांचा लाभ देतात.
हे अभियान जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जावे यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वतः आज मौजे भोणे, तालुका धरणगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. युवराज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या वारसांची भेट घेतली. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तातडीने देण्याबाबत संबंधितांना सूचना करून त्यांना पुरवठा विभागामार्फत धान्याचे वाटप केले. तसेच वारसांना सिंचन विहीर, संजय गांधी निराधार योजना, बचत गट व शासनाच्या ज्या योजनांच्या लाभासाठी हे कुटूंब पात्र ठरेल त्या योजनांचे लाभ तातडीने देण्याचे सुचित केले.
जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी धरणगाव येथील शेतकरी अनिल कणखरे यांच्या पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटला भेट दिली. जिल्हाधिकारी हे स्वतः शेतात उभे राहून कापूस वेचणी व कापसाचे मोजमाप करून घेतले. तद्नंतर मौजे भोणे येथे लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात कृषी विभागाच्या औजार बँकेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष जाधवर, तालुका कृषी अधिकारी अनिल माळी, मंडळ अधिकारी वनराज पाटील, तलाठी अविनाश पाटील, गणेश पवार आदींसह महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.