मुंबई, वृत्तसंस्था | सत्तास्थापनेचे काय होणार ? हा प्रश्न गेल्या १३ दिवसांपासून महाराष्ट्राला पडला आहे. मात्र सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपद भाजपाकडे आणि १६ मंत्रिपदे शिवसेनेकडे असा सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सत्तेचा हा फॉर्म्युला थेट समोरासमोर ठरलेला नसला तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मध्यस्थांमार्फत एकमेकांच्या संपर्कात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याद्वारेच हा फॉर्म्युला ठरल्याचेही समजले आहे. भाजपाने याआधी शिवसेनेला १३ मंत्रिपदे ऑफर केली होती. मात्र मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडायचा असेल तर निम्मी मंत्रिपदे द्या अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळेच सत्तास्थापनेचा पेच सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निकालाच्या दिवसापासूनच सत्तास्थापनेचा पेच महाराष्ट्रासमोर आहे. शिवसेनेने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे संजय राऊत यांनी वारंवार सांगितले. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार का? अशाही चर्चा रंगल्या. असे सगळे वातावरण असतानाच सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजले आहे. त्यामुळे आता १६ मंत्रिपदांच्या बदल्यात शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडल्याचेही समजते आहे.
२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. महायुतीला जनमताचा कौल मिळाला. त्यानंतर सरकारस्थापनेचा दावा कोणीही न केल्याने राज्यात नेमके काय होणार याचीच चर्चा रंगली होती. आता अखेर भाजपा आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेली कोंडी फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्रीपद हे भाजपाकडेच राहिल, असेही सूत्रांनी म्हटले आहे.