
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रसूतीपूर्व तपासण्यांमध्ये अल्ट्रासाऊंडचे वाढते महत्त्व लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जळगाव (खु.) येथे “डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण” या विषयावर निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संकरीत पद्धतीने होणारी ही शैक्षणिक कार्यशाळा रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. केतकी पाटील हॉल येथे सुरू होणार आहे.

रेडियोलॉजी विभागाच्या पुढाकारातून होणाऱ्या या कार्यशाळेत प्रसूतीपूर्व अल्ट्रासाऊंडच्या विविध पैलूंवर सखोल सत्रे आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानवृद्धीस चालना देण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना २ एमएमसी क्रेडिट पॉइंट्स प्रदान केले जाणार आहेत. यामुळे डॉक्टर आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांना व्यावसायिक प्रगतीसाठी उपयुक्त संधी उपलब्ध होणार आहे.
कार्यशाळेतील प्रमुख सत्रांमध्ये पहिल्या तिमाहीतील स्कॅन, एनटी आणि एनबी व्यतिरिक्त प्रसूती डॉपलरची भूमिका, अँटिनेटल केअरमध्ये मातृत्व मृत्यू प्रतिबंधातील रेडिओलॉजीचे योगदान, एनटी स्कॅन कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, अनोमली स्कॅन करताना वापरायच्या युक्त्या आणि प्रसूती डॉपलर करताना आवश्यक टिप्स यांचा समावेश आहे. या सत्रांमुळे अल्ट्रासाऊंड तपासणीतील अचूकता वाढविणे आणि जोखीम असलेल्या गर्भधारणांचे लवकर निदान करणे याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यशाळेत डॉ. रुचिता बागडी, डॉ. किरण पाटील, डॉ. अंजली भिरूड, डॉ. वैशाली चौधरी आणि डॉ. राजकिरण राठी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्यक्ष डेमोंस्ट्रेशनमुळे सहभागी डॉक्टरांना तांत्रिक बाबींची सखोल समज मिळणार असून क्लिनिकल कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. ३ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली असून स्पॉट नोंदणीची सोयही करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा ज्ञानवर्धक आणि उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



