…तर लवकरच लॉकडाऊनचा निर्णय : मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊन हा कोरोनाच्या प्रतिकारासाठी पर्याय नसला तरी याला सक्षम पर्याय तरी आज दिसून येत नाही. मात्र दृश्य स्वरूपात बदल झाला नाही तर दोन दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधतांना मुख्यमंत्री बोलत होते.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोनाने मायावी राक्षणाप्रमाणे देशाला विळखा घातला आहे. मधल्या काळात आपण कोरोनाला बर्‍यापैकी प्रतिकार केला होता. आपल्याला वाटले होते की, कोरोना आता संपला. मात्र असे झाले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र पुढे नेणारा अर्थसंकल्प मांडला. यानंतर कोरोनाचे रूग्ण वाढतच गेले. होळीपासून राज्यात शिमग्याला सुरूवात झाली. याला आपण वेळ येईल तेव्हा उत्तर देऊ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. मध्यंतरी आपण लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली होती. ही लॉकडाऊनची शक्यता आजही टळलेली नाही.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मध्यंतरी जणू काही कोरोना गेला असे सर्व व्यवहार सुरू झाले. यात लग्न, मोर्चे, राजकीय आंदोलने आदी झाली. यामुळे कोरोना वाढीस लागला. मात्र आता कोरोना अक्राळ-विक्राळ स्वरूपात आला आहे. आतापर्यंत आपण विष्णूचे अवतार ऐकले होते. मात्र हा विषाणू वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकत आहे. कोविडची साथ सुरू झाली तेव्हा तपासणीसाठी दोनच प्रयोगशाळा होत्या. आज पाचशे प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. आज आपण १ लाख ८२ हजार चाचण्या करत असून लवकरच दररोज अडीच लाख चाचण्या होणार आहेत. यातील ७० टक्के चाचण्या निकषानुसार आरटीपीसीआर या प्रकारातील असतील अशी माहिती त्यांनी दिली. आपण काहीही लपवले नाही आणि लपवणारही नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. कोरोनाच्या उपचारासाठी हॉस्पीटल्स आणि बेड संख्या देखील वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज पावणेचार लाख बेड उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. मला खलनायक ठरवले तरी चालेल मात्र जनतेच्या आरोग्याची काळजी आपण घेणार असल्याचे ते म्हणाले.

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, आधी १७ सप्टेंबर २०२० रोजी आधी सर्वाधीक रूग्ण होते. तर १ एप्रिल रोजी हा आकडा याच्या खूप पुढे गेला आहे. राज्यात विलगीकरणाचे ६२ टक्के बेड भरले गेले आहेत. आयसीयूचे बेड ४८ टक्के भरले आहेत. ऑक्सीजनचे बेड २५ टक्के आणि व्हेंटीलेटर्स २५ टक्के भरलेले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या १५ दिवसात या सुविधा अपूर्ण पडायला लागतील. सुविधा वाढू शकतात मात्र डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी कुठून येणार ? असा प्रश्‍न त्यांनी केला. तर आपण एका दिवसात तीन लाख लसीकरणाचा टप्पा गाठलेला आहे. आतापर्यंत ६५ लाख नागरिकांना लसीकरण केलेले आहे. मात्र याचा पुरवठा वाढायला पाहिजे. पुरवठा वाढल्यास आपण दिवसाला सहा ते सात लाख लोकांचे लसीकरण शक्य असल्याचे ते म्हणाले. मात्र लस घेतली तरीही मास्क घालणे अनिवार्य आहे. अर्थात, धुंवाधार पावसात एक छत्री असावी असे लसीचे काम आहे. आता वादळी पाऊस असल्याने सावधगिरी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाच्या प्रतिकारामध्ये राजकारण नको असे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी बजावले. याप्रसंगी त्यांनी लॉकडाऊनला विरोध करणार्‍यांचाही समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन केला तर रस्त्यावर उतरू असा काही जणांनी इशारा दिला आहे. तर या लोकांनी नक्कीच रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. मात्र कोरोनाच्या प्रतिकारासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. येत्या दोन दिवसांमध्ये निर्बंध जारी करण्यात येतील अशी माहिती सुध्दा त्यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content