वॉशिंग्टन, वृत्तसंस्था | इराणकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर युद्धाचे ढग दाटू लागले असून इराणमधील महत्त्वाची ५२ ठिकाणे निशाण्यावर असल्याचा थेट धमकीवजा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र हल्ला करुन इराणी लष्करातील परदेशात काम करणाऱ्या अल्-कुद्स दलाचा शक्तिशाली कमांडर जनरल कासीम सुलेमानी याचा खात्मा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला केला. त्यांनी बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र तसेच मोर्टार डागल्या. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे.
“अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही. हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. जर इराणने आमच्या ठिकाणांवर हल्ला केला तर इराणमधील ५२ ठिकाणे आमच्या निशाण्यावर असतील. इराणने पुन्हा हल्ला करु नये, असा माझा त्यांना सल्ला असेल. पण त्यांनी पुन्हा हल्ला केल्यास त्यांच्यावर कधीही झाला नसेल इतका शक्तीशाली हल्ला केला जाईल, अमेरिकेला नुकसान पोहोचवल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल”. अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. “अमेरिकेच्या सैन्याने इराणमधील ५२ ठिकाणे लक्ष्य केली असून यातील बहुतांश ठिकाणे ही इराणसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत किंवा तेथील सांस्कृतिक ठेवा आहेत. त्यामुळे इराणने वेळीच शहाणे व्हावे, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,” असेही ट्रम्प यांनी बजावले आहे.
दुसरीकडे, शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकावून युद्धाचे संकेत दिल्याचे म्हटले जात आहे. जामकरन मशिदीवरील धार्मिक झेंडा काढून लाल झेंडा फडकवण्याचा अर्थ युद्धाच्या घोषणेच्या रूपात घेतला जात आहे. कारण, इराणमधील कुठल्याही मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आल्याची घटना पहिल्यांदाच घडल्याचे सांगितले जात आहे.