ड्रग्ज प्रकरणात सोडलेल्यांपैकी एक राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाचा निकटवर्तीय – फडणवीस

मुंबई प्रतिनिधी | एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईत राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून दिल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी तसेच भाजपवर आरोप केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एनसीबीने जी कारवाई केली, यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आलं. काही लोकांना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून दिलं. मात्र यात त्याचा सहभाग नव्हता असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

फडणवीस म्हणाले की, एनसीबीच्या कारवाईत अनेक लोकांना पकडण्यात आलं होतं. यातील जे लोक क्लीन होते त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र ज्या लोकांकडे काही सापडलं होतं, त्यांना एनसीबीने पकडलं. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. याच्याविरोधात एखादी संस्था काम करत असेल तर आपण त्या एजन्सीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. खरं म्हणजे ज्या लोकांना सोडलं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस हादेखील होता. तो क्लीन असल्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही. तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे. ते कुठल्या पक्षाचे होते किंवा नव्हते हा मुद्दाच येत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीस यांनी वाब मलिक यांच्यावरदेखील टीका केली. एनसीबीचे खच्चीकरण करण्यात येत आहे का ? असे विचारताच त्यांनी नवाब मलिक यांचे दुखणे वेगळे आहे. त्याविषयी मी याआधीही बोललेलो आहे, असे खोचक वक्तव्य फडणवीसांनी केले.

Protected Content