जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज होत असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत ‘नूतन मराठा’तील केंद्रात बोगस मतदान होत असल्याचा आरोप करण्यात आल्याने गदारोळ झाल्याचे वृत्त आहे.
आज कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणूक होत आहे. जळगाव बाजार समितीच्या मतदानाचे शहरातील केंद्र हे नूतन मराठा महाविद्यालयात आहे. आज सकाळी आठ वाजेपासून मतदान सुरू झाले. दरम्यान, सकाळी नऊ वाजेच्या सुमारास धुडकू सपकाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी या केंद्रावर बोगस मतदान होत असल्याची तक्रार केली. यावरून येथे बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी हमाल-मापाडी नसलेले काही लोक मतदान करत असल्याची उघडकीस आल्याने धुडकू सपकाळे आणि त्यांचे सहकारी आक्रमक झाले. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नूतन मराठातील मतदान केंद्राच्या परिसरातील वातावरण निवळले होते.