नवी दिल्ली वृत्तसंस्था । सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करताना हिंसक आंदोलन करत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली असून या आंदोलकांना ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बुधवारी ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये रामपूरमधील २८, संभळ येथील २६, बिजनोर येथील ४३ आणि गोरखपूरमधील ३३ जणांचा समावेश आहे.
नोटीसमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, आंदोलन करताना रामपूरमध्ये १४.८ लाखांची, संभळ येथे १५ लाख तर बिजनोरमध्ये १९.७ लाखांच्या संपत्तीचं नुकसान करण्यात आले आहे. गोरखपूरमध्ये नेमकं किती नुकसान झाले आहे. याचा आढावा अद्याप अधिकारी घेत आहेत. रामपूरचे जिल्हाधिकारी अनुजनेय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओत आणि फोटोंमध्ये जे आंदोलक हिंसाचार करत संपत्तीचे नुकसान करताना दिसत होते त्यांनाच नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. यादरम्यान आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, नगर परिषद, पोलीस लाईन यांच्याशी संपर्क साधत हिंसाचारात झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. ज्या २८ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यापैकी काहींना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्यांपैकी अनेकजण यामध्ये आपली काहीच भूमिका नव्हती, असा दावा करत आहेत.