जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवून शासनाच्या सेवा थेट गावपातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने धरणगाव तालुक्यातील झुरखेडे मंडळात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित या भव्य शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ शेकडो नागरिकांना देण्यात आला.
महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने आणि तातडीने सोडवाव्यात, असे आवाहन केले. ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी तालुका किंवा जिल्हा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी शासनाच्या सेवा थेट गावात उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे या शिबिरातून तसेच पुढेही प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी व ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना दिल्या.

या शिबिरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेले एकूण ७६५ दाखले वितरित करण्यात आले. त्यामध्ये जात प्रमाणपत्र १०२, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ८९ आणि उत्पन्न प्रमाणपत्र १२४ यांचा समावेश आहे. सुलभ शेतकरी योजना अंतर्गत तालुक्यातील १५८१ गटांमधील तसेच झुरखेडे मंडळातील २६४ गटांमधील 7/12 उताऱ्यावरील ‘तुकडा’ हा शेरा कमी करून दुरुस्ती करण्यात आली व शेतकऱ्यांना दुरुस्त उतारे देण्यात आले. तगाई कर्ज, आयकट बोजे व बंडीग बोजे अशा कालबाह्य नोंदी कमी करून डिजिटल 7/12 व 8अ उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. तसेच डिजिटल 7/12 च्या कायदेशीर वैधतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ‘जिवंत 7/12’ मोहिमेअंतर्गत तालुक्यातील ७५९ मयत खातेदारांच्या वारस नोंदी घेऊन त्यांच्या नावांची 7/12 वर नोंद करण्यात आली व उतारे वितरित करण्यात आले. त्यामध्ये झुरखेडे मंडळातील १२५ प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय अकृषक तरतुदीतील सुधारणा, विकास आराखड्याच्या मंजुरीनंतर अकृषक परवानगीची नवीन व्यवस्था तसेच एकदाच अधिमूल्य भरण्याच्या सोप्या पद्धतीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून अनेक सेवा देण्यात आल्या. त्यामध्ये नवीन रेशन कार्ड ३१, वारस फेरफार १२५, कालबाह्य नोंदी कमी ७४१, आयुष्मान भारत कार्ड १५ आणि घरकुल लाभार्थी नमुना ८ – ३० अशा सेवांचा समावेश आहे. पंचायत समिती धरणगावतर्फे रोहयो प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर कृषी विभागामार्फत कांदा चाळ पूर्वसंमती ५, पॅक हाऊस पूर्वसंमती १ आणि शेततळे पूर्वसंमती १ मंजूर करण्यात आले. भूमी अभिलेख विभागामार्फत ९ गावांतील एकूण २३०० ड्रोन सर्वे सनदांचे वितरणही करण्यात आले. तसेच घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी यांसारख्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले, तर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून या अभियानामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, संदीप मोरे, मंडळ अधिकारी हेमंत महाजन, ग्राम महसूल अधिकारी शांतीलाल नाईक, हर्षल थाटे, मोहन चौगले, जावेद देशमुख, गौरव बाविस्कर, गट विकास अधिकारी किशोर वानखेडे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, दत्तात्रय वाघ, भूमी अभिलेख उपअधीक्षक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील सरपंच म्हणून सुरेश पाटील, छाया पाटील, विजय पाटील, वंदना शंकर पाटील, उत्तम देवचंद सोनवणे, मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण, गुलाबकांत चव्हाण, सुरेश पाटील, गुलाबराव सोनवणे, धिरज पाटील, मिलिंद पाटील, कैलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच परिसरातील पोलीस पाटील म्हणून प्रल्हाद चौधरी, छाया नवल अहिरे, दिलीप सावळे, वर्षा अनिल बोरसे, मुकुंदराव यशवंत निकम, भिका पाटील, सुनिल धनगर, पुरुषोत्तम पाचपोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



