नागरीकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : ना. गुलाबराव पाटील

ff0eba0f 9af8 49c9 8ed9 b91b70acc2cb

 

जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या विविध योजनांच्या लाभ मिळविण्यासाठी विविध शासकीय विभाग व कार्यालयांकडे पाठपुरावा करावा लागतो. प्रसंगी एखाद्या दाखल्यासाठी गाव, तालुका व जिल्हापातळीवर जावून दाखला प्राप्त करावा लागतो. शासकीय योजनांची जत्रा व कृषी महोत्सवासारख्या लोकोपयोगी उपक्रमांतून विविध दाखले शहरी तसेच ग्रामीण भागातील जनतेला अगदी घरपोहच मिळणार आहे. नागरीकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी खासदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या जत्रेच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले आहे. या उपक्रमाचा जास्तीत-जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

महाराष्ट्र अभियान विस्तारीत समाधान योजनेतंर्गत चाळीसगाव येथे आयोजित शासकीय योजनांची जत्रा, कृषी व सांस्कृतिक महोत्सव उद्घाटन राज्यमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष ना. पाशा पटेल, खासदार उन्मेश पाटील, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष के. बी. साळुंखे, केंद्रीय कृषी अनुसंसाधन प्रशासक कैलास सुर्यवंशी, योगाचार्य वसंतराव चंद्रात्र्ये, न. पा. गटनेते संजय पाटील, पंचायत समिती उप सभापती संजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती महेंद्र पाटील, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, तहसिलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी अतुल पाटील यांचेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार राज्यमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, शासकीय योजनांची जत्रा व विविध योजनांचे लाभार्थ्यांना वाटप यासारख्या जनहितार्थ उपक्रमांतर्गत आयुष्यमान भारत योजना, उज्वला गॅस योजनेतंर्गत वाटप, जेष्ठ नागरीकांना एसटीचे स्मार्ट कार्ड, कामगारांना सुरक्षा किटचे वाटप, कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभार्थी निवड करण्यासाठी लकी ड्रा यासारख्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी शासन या जत्रेच्या माध्यमातून आपल्या दारी आले आहे. जनतेने याचा लाभ घेवून आपल्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना याचा लाभ मिळवून द्यावा व आपला पैसा, वेळ वाचवावा. शासनाच्या कोणत्याही योजनेपासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाहीत यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत असेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष ना. पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा ओहापोह करताना निसर्गाच्या असमतोलामुळे पाणीटंचाईचे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनियमित पर्जन्यमान व पाण्याचे दुर्भिष्य, शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाल्याचे सांगून अशा लहरी वातावरणाशी सामना करण्यासाठी वृक्ष लागवड व जल संवर्धनावर भर देवून जलसंधारण, पुर्नभरणसारख्या उपक्रमात सर्व शेतकरी, शासन व प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नातूनच हे शक्य होणार असल्याचे ना. पाशा पटेल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

 

 

प्रास्ताविकात खासदार उन्मेश पाटील यांनी यापूर्वी आयोजित केलेल्या शासकीय जत्रांमधील अनुभव विषद करताना तालुक्यातील काही गावांनी केलेल्या उल्लेखनीय कामांचा उल्लेख करून तालुक्यातील गोठे योजना, एकाच छताखाली शासन व प्रशासन एकत्र येवून तालुक्यातील शिंदीसारख्या खेडेगावात 141 शेततळे निर्माण करून शिवार हिरवेगार झाल्याचे सांगून तालुक्यात 22 हजार 500 नागरीकांना रेशनकार्ड, 4500 नागरीकांना जातीचे दाखले, 42 हजार 500 कुटूंबाना आयुष्यमान योजनेचा लाभ, 3500 नागरीकांना एसटीचे स्मार्टकार्ड, 1235 लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान, 650 विहिरीचे पुर्नभरणाचा लाभ देण्यात येणार असल्याचे खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी या जत्रेत त्यांना पाहिजे असलेल्या योजनांसाठी अर्ज करुन लाभ घ्यावा. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष उगले यांनी तर आभार संजय पाटील यांनी मानले.

Protected Content