वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी तातडीने सोडण्यात यावे आणि मंजूर टाकीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी हजारो नागरिकांनी आणि महिलांनी आज सकाळी 10 वाजेपासून वरणगाव नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्या दालनात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मातीच्या घागरी घेऊन आलेल्या महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला की, जोपर्यंत नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी सोडले जात नाही आणि मंजूर पाण्याच्या टाकीचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत कोणीही दालनातून उठणार नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजप शहराध्यक्ष सुनील माळी, उपनगराध्यक्ष शेख आखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे, तसेच अनेक नगरसेवक आणि स्थानिक नेते उपस्थित होते. महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शेवटी, मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी 10 एप्रिलपर्यंत नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी सोडण्याचे आणि मंजूर टाकीचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आंदोलन 12 एप्रिलपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संजय सावकारे यांनी मुख्याधिकारी राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून 10 एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले. जर 10 एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर 12 एप्रिलपासून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन आपल्या आश्वासनावर किती ठाम राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.