यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात मयत व्यक्तींना नेण्यासाठी शासकीय शववाहिका उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडे शववाहिका खरेदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक आणि मानवतावादी दृष्टीकोनातून ही सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.
यावल शहरामध्ये सध्या कोणतीही शासकीय शववाहिका नसल्याने मृतदेह वाहतुकीसाठी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक वेळा गरीब व गरजू कुटुंबांना यासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेकडून शववाहिका उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. नगरपरिषदेकडून ही सेवा सुरू झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळू शकेल.
या संदर्भात शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक सागर चौधरी यांनी नगराध्यक्ष सौ. छाया पाटील यांना मागणी अर्ज सादर केला आहे. आपल्या निवेदनात त्यांनी यावल शहरासाठी शववाहिका खरेदी करून ती नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.
या वेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील हेही उपस्थित होते. त्यांनीही या मागणीला पाठिंबा देत नगरपरिषद प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले.



