पहूर (ता. जामनेर) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेंदुर्णी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, पहूर शहरात आज (ता. १८ ऑगस्ट) नागरिकांनी एकत्र येत पूर्ण बंद पाळला. संविधान निर्माते बाबासाहेबांविषयी असलेल्या आदरभावनेतून आणि या कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी व्यावसायिकांनीही आपले व्यवहार बंद ठेवत सहभागी होण्याची जबाबदारी घेतली.
स्वातंत्र्यदिनी शेंदुर्णी येथे घडलेल्या या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली होती. समाजकंटकाने केलेल्या या कृत्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आले. तरीही, या घटनेच्या निषेधार्थ पहूर येथे आज नागरिकांनी कोणत्याही राजकीय संघटनेच्या आवाहनाशिवाय बंदचा निर्णय घेतला.

पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. यात दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या अशा कृत्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिवाळे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष किरण खैरनार, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, नरेश मोरे, लहानु दाभाडे, विक्रम नरवाडे, विशाल दाभाडे, स्वप्निल मोरे, गणेश तायडे, छोटू मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. बंद दरम्यान पोलिसांनी योग्य ती काळजी घेत बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ही केवळ मूर्तीची नव्हे तर संविधानाच्या मूल्यांची विटंबना असल्याची भावना व्यक्त होत असून, पहूरवासीयांनी शांततेत आणि शिस्तबद्धरीत्या हा निषेध नोंदवत समाजात सकारात्मक संदेश दिला आहे.



