रस्ता काँक्रीटीकरणासाठी नागरिकांचा एल्गार; महापालिकेसमोर घोषणबाजी व निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील दुर्वांकुर पार्क ते गुड्डूराजा नगर, पिंप्राळा रोडपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी संतप्त नागरिकांनी आज महानगरपालिकेवर धडक दिली. महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद न साधता केबिनमध्ये निघून गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आणि त्याविरोधात अधिक तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

३५ वर्षांपासून दुर्लक्षित रस्त्याची समस्या
या परिसरातील रहिवासी गेल्या ३५ वर्षांपासून रस्त्याच्या समस्येला तोंड देत आहेत. ते नियमितपणे महापालिकेला कर भरत असले तरी अद्याप त्यांना योग्य रस्ता मिळालेला नाही. कच्च्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ, चिखल आणि अपघातांची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारही नसल्याने पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असतो. अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला.

नागरिकांचा इशारा: कर भरणार नाही!
संतप्त नागरिकांनी प्रशासनाला ठणकावत सांगितले की, जर तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही, तर आगामी काळात महापालिकेचे कुठलेही कर भरणार नाहीत. रस्त्यांसाठी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने आता अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला.

महापालिका आयुक्तांचा नकारात्मक प्रतिसाद
आंदोलनादरम्यान नागरिकांनी महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आंदोलनकर्त्यांकडे दुर्लक्ष करत थेट आपल्या केबिनमध्ये निघून गेल्याने नागरिकांचा संताप अधिक वाढला. या प्रकारामुळे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांनी आणखी जोरदार घोषणाबाजी केली.

रस्त्याच्या कामासाठी ठोस निर्णयाची मागणी
रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याने नागरिकांनी महानगरपालिकेकडे ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. जर लवकरात लवकर रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था केली नाही, तर नागरिक अधिक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला.

Protected Content