यावल येथे अनियमित व अल्प पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त

short

यावल (प्रतिनिधी) शहरातील महाजन गल्ली, म्हसोबा मंदिर, बारीवाडा व इतर अनेक ठिकाणी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पाणीपुरवठा होतो, मात्र देशमुखवाडा, माळीवाडा, बसमळा परिसरात पाणी अत्यंत अल्प प्रमाणात होत असल्याने तसेच आज गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पाणी न मिळाल्याने स्त्री-पुरुष ,तरुणांनी आज सकाळी ६.०० वाजता नगराध्यक्षा सौ. सुरेखा कोळी, नगरसेविका पौर्णिमा फालक यांच्या घरावर मोर्चा काढून संतप्त भावना व्यक्त केल्या.

 

देशमुखवाडा, माळीवाडा, बसमळा जवळील भागात पाणीपुरवठा होत नसल्याने गेल्या एक वर्षभरापासून नागरिकांच्या लेखी तक्रारी नगरपरिषदेकडे दाखल आहेत. पाणीपुरवठा विभागप्रमुख देवरे यांच्यासह प्रभागातील संबंधित नगरसेवक जाणून-बुजून त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, शहरात ९० टक्के भागात वाजवीपेक्षा जास्त पाणी पुरवठा होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येते, सुमारे ५० टक्के पाणी गटारीत व रस्त्यावर फेकून पाण्याचा सर्रास गैरवापर होतो तर दूसरीकडे दुर्लक्षित असलेल्या समाजाच्यालोकांना पाणीपुरवठा करण्यात नगरसेवक निष्क्रिय ठरत आहेत, असा आरोप याभ्गातील नागरिक करीत आहेत. पाणी पुरवठा विभाग प्रमुख देवरे हे बाहेर गावाहून दररोज ये-जा करतात आणि नियमितपणे कार्यालयात उपस्थित नसतात. पाणीपुरवठा विभागातील कारभाराची चौकशी झाल्यास अनेक बोगस नळ कनेक्शन, घरगुती वापराच्या नावावर व्यवसायाच्या ठिकाणी नळकनेक्शन, नवीन कनेक्शन देताना व नळ खंडित करताना रोड रस्ता फोडण्याचा खर्च वसूल करणे, अशा प्रकारचे इतर अनेक घोटाळे उघड होतील, असा आरोपही नागरिक करीत आहेत. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी तातडीने लक्ष घालून इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पाणी सोडण्याची पर्यायी व्यवस्था केली असली तरी परिसरातील लोकांना नियमितपणे सुरळीत पाणीपुरवठा कधी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Add Comment

Protected Content