जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय मोहिमेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी आपला स्वतःचा आराखडा तयार करत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता यावर भर देऊन एक प्रगत आणि भविष्यकालीन महाराष्ट्र घडवणे हा आहे. या महत्त्वपूर्ण दृष्टीकोनाला आकार देण्यासाठी, शासनाने १८ जून २०२५ पासून राज्यभरात नागरिक सर्वेक्षण सुरू केले आहे.
या सर्वेक्षणाद्वारे, सर्वसामान्य नागरिकांचे विचार, अपेक्षा आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेणे शासनासाठी महत्त्वाचे आहे. नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, शासनाने सर्व विभागांना आणि प्रशासन यंत्रणेला व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शाळा-महाविद्यालये, स्थानिक केबल नेटवर्क, एफ.एम. रेडिओ, साप्ताहिके, वर्तमानपत्रे, बाजारपेठा, गावाच्या वेशीवर फलक, व्हॉट्सॲप ग्रुप, पथनाट्ये आणि फिरती प्रचारवाहने अशा विविध माध्यमांचा वापर केला जात आहे.

या उपक्रमाचा अंतिम उद्देश २०४७ पर्यंत महाराष्ट्राला विकसित राज्यांच्या अग्रभागी नेणे हा आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी आणि ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या व्हिजनला आकार देण्यासाठी नागरिकांना आमंत्रित करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण ७ सोप्या प्रश्नांवर आधारित असून, नागरिक ऑप्शन्स निवडू शकतात, माहिती लिहू शकतात किंवा आपला आवाज रेकॉर्ड करून अभिप्राय देऊ शकतात. नागरिकांनी https://wa.link/o93s9m या लिंकवर जाऊन आपली माहिती भरण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.



