Home क्राईम सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला ४८ लाखांचा गुटखा; लाखाेंचा मुद्देमाल जप्त

सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला ४८ लाखांचा गुटखा; लाखाेंचा मुद्देमाल जप्त


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे शाखा आणि पाळधी पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून धरणगाव तालुक्यातील सावदे शिवारात एका कंटेनरचा थरारक पाठलाग करत तब्बल ४८ लाख २२ हजार २६४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत गुटख्यासह २५ लाखांचा कंटेनर असा एकूण ७३ लाख २२ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

जळगाव महामार्गावरून गुटख्याची मोठी खेप जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महामार्गावर पाळत ठेवली. संशयास्पद कंटेनर (क्र. एम.एच. १८ बी.जी. ७५५८) येताना दिसताच पोलिसांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने कंटेनर न थांबवता वेगाने पळवून नेला. यानंतर पाळधी पोलीस आणि एलसीबीच्या पथकाने या कंटेनरचा ‘सिनेस्टाईल’ पाठलाग सुरू केला. अखेर सावदे शिवारात पोलिसांनी मोठ्या शिताफीने कंटेनर अडवण्यात यश मिळवले.

कंटेनरची तपासणी केली असता, त्यात १२८ मोठ्या गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा लपवलेला असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पाचारण केले आणि त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण मालाचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी कंटेनर चालक प्रदीप भाटू पाटील (रा. साक्री, जि. धुळे) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि पाळधी पोलीस चौकीच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. या गुटख्याचे उगमस्थान कोठे आहे आणि हा माल कोणाकडे जात होता, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. महामार्गावरील या धाडसी कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


Protected Content

Play sound