चोपडा, प्रतिनिधी | येथील चोपडा साखर कारखाना भाडेतत्वार चालविण्यास पुणे येथील सृष्टी शुगर प्रा. लि.तर्फे हालचाली सुरु झाल्या होत्या. परंतु, कारखान्यातील भानगडी, मोर्चा, धमक्या पाहून कारखाना चालविण्याच्या वेगळा विचार करावा लागेल असे पत्र सृष्टी शुगरतर्फे चोसाकाला प्राप्त झाले असल्याची माहिती चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, संचालक प्रविणभाई गुजराथी, यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चंद्रशेखर पाटील, सुनील महाजन, निलेश पाटील आदी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की, चोपडा साखर कारखाना नुकसानित असल्याने शेतकरी हिताचा दृष्टीने कारखान्याला भाडे तत्वावर देऊन तालुक्यात परत एकदा ऊस उत्पादकाना दिलासा दयावा असा निर्णय जनरल मीटिंगमध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार नेते मंडळी, संचालक मंडळ, काही कामगार, काही शेतकरी, यांनी सर्वानुमते सृष्टी शुगर प्रा. लि. पुणे यांना कारखाना भाडेतत्त्वावर दयायचा असा निर्णय झाल्यानंतर सृष्टी शुगर प्रा.लि.चे महेश खैरनार यांनी पाच कोटींचा डी. डी. देखील दिला आहे. परंतु, नोटरी करून लिहून घेतले आहे की, सृष्टी शुगर सांगेल त्यावेळी हा डी. डी. बँकेत वटविण्यासाठी टाकावा. यानंतर महेश खैरनार हे परदेशात गेले आहेत. मी प्रत्यक्षात येईन आणि कामगार शेतकऱ्यांची बैठक बोलावून सर्वाचे समाधान करून विश्वासात घेऊन आम्ही कारखाना सुरू करू असे सकारात्मक भूमिका घेऊन खैरनार यांनी मांडली होती. पाच कोटींचा डीडी दिला होता मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही सदरची देणी देण्यास विलंब होत आहे. चोसाका संदर्भात रोज वृत्तपत्रातील बातम्या, भानगडी, मोर्चे, व धमक्या येऊन तालुक्यातील वातावरण दुषित होत असेल तर आम्हाला कारखाना चालविण्यासाच्या दृष्टीने वेगळा विचार करावा लागेल अश्या संदर्भातील पत्र कारखानाला मिळाले आहे. रितसर कायदेशीर मार्गाने भाडेतत्त्वावर देण्याचे टेंडर निघेल त्याच वेळेस टेंडर भरून शासन जे ध्येय धोरण ठरवेल त्यानुसार आपला कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यात येईल अशा आशयाचे पत्र मिळाल्याने संचालक मंडळ देखील चिंताग्रस्त आहे. पत्रकार परिषदेत संचालक मंडळाला याला पर्याय काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता आज तरी आमच्याकडे दुसरा कोणतीही पर्याय नाही की जो भाडेतत्त्वावर घेईन. आम्ही मिटकॉनला प्रस्ताव पाठविला आहे तर त्यानुसार मिटकॉन जाहिरात काढेल आणि तेव्हा बघू असे संचालक मंडळाने स्पष्ट केले.