चोरी झालेला मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादीला केला स्वाधीन

shahar police

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीरामपेठ परिसरात असलेले दुकान फोडून चोरट्यांनी गेल्या महिन्यात डल्ला मारला होता. शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात संशयितांना अटक करून त्यांच्याकडून सर्व रोकड हस्तगत केली होती. मंगळवारी न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी फिर्यादीला सर्व मुद्देमाल स्वाधीन केला आहे.

सिंधी कॉलनीतील रहिवासी सुभाष तुलसीदास कुकरेजा यांच्या मालकीच्या ओम स्पोटर्स या बळीरामपेठेतील दुकानातून चोरट्यांनी दि.17 जुलै रोजी डल्ला मारत लाखोंची रोकड लंपास केली होती. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही दिवसात दोन संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 2 लाख 47 हजारांची रोकड हस्तगत केली होती. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी फिर्यादीला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नीलाभ रोहन, पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या हस्ते संपूर्ण रोकड परत देण्यात आली. यावेळी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे, सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, कैलास चौधरी, हवालदार विजय निकुंभ, रतन गिते आदी उपस्थित होते.

चोरलेली दुचाकी केली परत
सुप्रीम कॉलनीतील हर्षल राजेश सुतार या तरूणाने गोलाणी मार्केटमध्ये 18 जुलै रोजी दुचाकी क्रमांक एमएच.19 सीजी.1285 ही लावली असता चोरट्यांनी लंपास केली होती. दरम्यान, शहर पोलिसांनी संशयितांचा शोध घेवून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला होता. मंगळवारी पोलिसांनी फिर्यादीला त्याची दुचाकी न्यायालयाच्या आदेशाने परत केली.

Protected Content