चोपडा, प्रतिनिधी | येथील श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयास नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडेशन अर्थातच एनबीए समितीकडून तीन वर्षाचे एनबीए मानांकन मिळाले आहे. यापूर्वी या संस्थेला वर्ष २०१६ मध्ये ‘एनबीए’चे तीन वर्षांचे मानांकन मिळाले होते, आता पुन्हा मानांकन मिळाले आहे.
महाविद्यालयास पुन्हा मानांकन मिळाल्यामुळे महाविद्यालया हे सलग सहा वर्षे ‘एनबीए’ मानांकन प्राप्त करणारे राज्याच्या ग्रामीण भागातील आणि जळगाव जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज ठरले आहे. यामुळे ‘चोपडा फार्मसी कॉलेज’ची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे, अशी माहिती महात्मा गांधी शिक्षण मंडळचे अध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी दिली. २०१६ मध्ये नवीन नियमानुसार ‘एनबीए’च्या कसोटीला सामोरे जाणारे चोपडा कॉलेज हे राज्यातील एकमेव फार्मसी कॉलेज होते. आता मागील तीन वर्षातील प्रत्येक विभागातील प्रवेश संख्या, आणि पीएचडी असणारे शिक्षक, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण अशा विविध बाबींचा अहवाल ‘एनबीए’ कार्यालयाला कॉलेजने सादर केला होता. एनबीए मानांकन झालेल्या विद्यालयांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ तसेच विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी थेट प्रवेशाचा संधी मिळते. वॉशिंग्टन अॅकॉर्ड अंतर्गत येणार्या सर्व योजनांचा फायदा विद्यालयाला, विद्यार्थी व शिक्षकांना उपलब्ध होतो. ‘एनबीए’ मानांकन मिळाल्याबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, उपाध्यक्ष आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, कार्यकारी संचालक देविदास देशमुख, समन्वयक दिलीप साळुंखे यांनी प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सदस्य व सर्व विध्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.