
चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा आगारातून निघालेल्या चोपडा-विचखेडा बसचे चाक चहार्डी तालुका फाट्यावर चक्क निखळून गेले, यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चहार्डी येथील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेला ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत टाकण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे खचलेला रस्ता कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.

बुधवारी (२३ जुलै) बस चोपडा आगारातून निघून अकुलखेडा गाव थांबा करून पुढे शिरपूर रोडावरून चहार्डी गावाकडे वळण घेत असताना, अचानक चालकाकडील बसचे चाक निखळून गेले. बसमधील सर्व प्रवासी आरडाओरड करू लागले. त्याचवेळी चहार्डी फाट्यावर भिलट बाबा दिंडीला जाणाऱ्यांना सोडण्यासाठी आलेले चहार्डी येथील भूषण कोळी व त्यांच्या मित्रांनी ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली. तात्काळ चालकाने बस थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून खाली उड्या घेतल्या, तर बाकी प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
चालकाला या प्रकरणाबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, “दोन गाड्यांचा (प्रवाशांचा) भार एकाच गाडीत असल्याने असे झाले.” मात्र, प्रत्यक्ष जागेवर शिरपूर रोडवरून चहार्डी गावाकडे वळण घेण्याच्या ठिकाणी अनेर धरणावरून ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्त्यावर जेसीबीद्वारे खोदकाम करून पाईप टाकण्यात आले आहेत. यामुळे त्या ठिकाणी रस्ता खचला असून, बससारख्या मोठ्या वाहनांचा तोल एका बाजूला जातो, असे स्थानिकांनी सांगितले.
या घटनेचा व्हिडिओ चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांना पाठविण्यात आला आहे. महेंद्र पाटील यांनी याबाबत बांधकाम उपअभियंता, चोपडा यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे म्हटले आहे. खचलेल्या रस्त्यामुळे भविष्यातही असे अपघात होण्याची भीती व्यक्त होत असून, बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.



