जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलीचे नाव घेतल्याच्या कारणावरून तरूणाला चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शंकर सुरेश सोनवणे (वय-२६) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शंकर सोनवणे याने एका मुलीचे नाव घेतल्याच्या कारणावरून मंगळवारी १७ मे रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास योगेश भागवत कोळी, निलेश राजपूत (पुर्ण नाव गाव माहित नाही) यांच्यासह इतर दोन जणांनी शंकर सोनवणे हा दुचाकीने रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानासमोरून जात असतांना अडविले. मुलीचे नाव का घेतले असे बोलून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. योगेश कोळी व निलेश राजपूत यांनी चॉपरने शंकरवर वार करून जखमी करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमीवस्थेत तरूणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
याप्रकरणी बुधवार १८ मे रोजी दुपारी संशयित आरोपी योगेश भागवत कोळी, निलेश राजपूत (पुर्ण नाव गाव माहित नाही) यांच्यासह इतर दोन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.