चोपडा प्रतिनिधी | येथील भगिनी मंडळ चोपडा संचलित ललित कला केंद्रात ‘मतदान जनजागृती अभियान’ अंतर्गत भित्तीपत्रक स्पर्धा नुकतीच घेण्यात आली.
विधानसभा निवडणूक मतदान २०१९ चे औचित्य साधत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मतदान हक्क – माझा अधिकार, सुरक्षित मतदान एक – आव्हान, प्रलोभन मुक्त मतदान – एक गरज, मताधिकार – लोकशाहीचा जागर, मतदान केंद्रावर मतदानासाठी दिव्यांग, माता, वृद्धांसाठीच्या सुविधा या पाच विषयांवर विविध माध्यमातून भित्तीचित्रे विद्यार्थ्यांनी तयार केली होती. देशाला आपले योगदान देऊन सक्षम नेता निवडण्यासाठी मतदान अवश्य करा, असे विविध विचार व्यक्त करणारे भित्तिचित्र ललित कला केंद्राच्या ४०-४५ विद्यार्थ्यांनी मेहनतीने तयार करण्यात आले. या चित्रांचे प्रदर्शन लावून सर्व चित्र प्रदर्शित करण्यात आली.
या प्रसंगी चोपडा तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी डॉ.भावना भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. भितीचित्रे बघून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत शाबासकी देत आपले मनोगत व्यक्त केले. त्यात आपण सर्वांनी समाजालाच नव्हे तर देशाला एक उत्तम असा संदेश देतो. मतदाना विषयी कसे प्रेरित केले ते या चित्रांमधून आपण दाखविले असे म्हणत त्यांनी पुरस्कृत चित्रांचे निरीक्षण करून यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार ही यावेळी केला. भित्तिचित्र प्रदर्शनास उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी. चौधरी तसेच मतदान नोडल अधिकारी युवराज पाटील यांनी भेट देऊन ललित कला केंद्राच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
स्पर्धेचे विजेते
प्रथम क्रमांक – कोळी निखिल छन्नू (बोराअजंटी) एटीडी द्वितीय वर्ष, द्वितीय क्रमांक – मराठे पल्लवी विवेक (शिरपूर) ए टी डी प्रथम वर्ष, तृतीय क्रमांक – राजपूत जसवंतसिंग डोंगरसिंग (सांगवी ता.शिरपूर) जी.डी. आर्ट वर्ग, चतुर्थ क्रमांक- बंजारा विनोद मोहन (बभळाज ता.शिरपूर) ए टी डी द्वितीय वर्ष तर पाचवा क्रमांक – मुंडले प्रणय रविंद्र (जामनेर) फौंडेशन वर्ग यांना बक्षीसे देण्यात आले.
प्रदर्शनातील चित्रे तयार करण्यासाठी प्राचार्य राजेंद्र महाजन, प्रा.साळी, प्रा.बारी प्रा.पाटील प्रा.संजय नेवे यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय नेवे यांनी केले.तर यशस्वीतेसाठी लिपिक भगवान बारी सेवक अतुल अडावकर आणि प्रवीण मानकरी यांनी सहकार्य केले. संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, सहसचिव सौ.अश्विनी गुजराथी, आणि इतर पदाधिकारी यांनी भेट देऊन कौतुक केले.