चोपडा येथे तृतीयपंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण

dhwarohan

dhwarohan

चोपडा लतीश जैन । येथील गांधी चौकात शहर सामाजिक व सांस्कृतीक समितीच्या वतीने साजर्‍या करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात तृतीयपंथियांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, गांधी चौक येथे चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समिती व गांधी चौक परिवार यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. यावर्षी चोपडा येथील तृतीयपंथी भूरीजान गुरु आरती जान व आरतीनायक गुरुकमला माँ जान यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेने कलम १४ नुसार समानतेच्या तत्त्वाचा स्वीकार केला आहे. समानतेच्या तत्त्वानुसार भारतीय नागरिकांमध्ये धर्म, जात, लिंग, आर्थिक परिस्थिती या आधारे भेदभाव करता येत नाही. लिंग समानतेच्या या तत्त्वानुसार मुलगा – मुलगी / स्त्री-पुरुष समानता सोबतच तृतीयपंथाच्या देखील समावेश होतो. परंतु आज समाजात त्याना पाहिजे तसा सन्मान मिळत नाही. तृतीयपंथी देखील भारतीय नागरिक असून त्यांना देखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे देशात सन्मान मिळावा या हेतूने समाजातील या वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गांधी चौकात भुरा जान यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या हस्ते झेंडावंदन ध्वजारोहन करण्याचा हा कदाचित पहिलाच कार्यक्रम असेल.

याप्रसंगी बोलताना भुरीजान हीने सांगितले की, आज मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी भारतातील सर्व तृतीयपंथीयांच्या वतीने आयोजकांचे आभार मानते आणि गांधी चौक व महात्मा गांधी शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या सर्व सदस्यांना पुढील भरभराटीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते.यावेळी आरतीनायक यांनी बोलताना सांगितले की, आम्ही आमच्या मुलांच्या शाळेत ध्वजारोहणला जात असतो परंतु ध्वजारोहण सन्मान आम्हाला ही मिळेल असं कधी वाटले नव्हते परंतु चोपडा वासीयांनी तो सन्मान दिला ह्यासाठी आम्ही सर्व आयोजकांचे आभारी आहोत. येथील गांधी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर ध्वजारोहण होत असते. मात्र या ध्वजारोहणला एकही राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी , कोणीही हजर नसल्याने उपस्थितांनी खंत व्यक्त केली. यशस्वीतेसाठी समिती सदस्य भटू पाटील अर्जुन चौधरी नितीन बिरारी, रामकृष्ण चौधरी, मनिष नेवे, राजेंद्र नेवे, ललीत सुतार, गोकुळ चौधरी, सुभाष लाड यांनी परिश्रम घेतले.

Protected Content