चोपडा प्रतिनिधी | गस्त घालणार्या पथकातील तलाठ्याला मारहाण करणार्या वाळू माफियांपैकी एकाला अटक करण्यात आली असून दुसरा मात्र फरार झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, २५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तलाठ्यांचे पथक अवैघ गौणखनिजाच्या चोरीला आळा घालण्यासाठी गस्त घालत होते. या वेळी वाळूने भरलेले ट्रॅक्टर (एमएच- १९, सीझेड- ०५४३) पथकाने अडवून चालकाची विचारपूस केली. यावेळी त्याने पथकाशी हुज्जत घातली. तर चालकासोबत असलेल्या व्यक्तीने ट्रॅक्टरमधून फावडा काढत आबाजी सोनवणे यांच्या डोक्यावर दांड्याने वार केला. तसेच लाथ मारुन सोनवणे यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर चालकासह व तो व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला. परंतु, चालक राजू भील याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दुसरा संशयित फरार आहे.
या पथकात आबाजी सोनवणे, भूषण पाटील, आशिष काकडे, कल्पेश कुंवर यांचा समावेश होता. या प्रकरणी शहर तलाठी आबाजी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसांत कलम ३५३, ३७९, ३३२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करत आहेत.