चोपडा प्रतिनिधी । बुलढाणा अर्बन नागरी सहकारी बँकेने सेटलमेंटची तयारी दर्शविल्यामुळे तालुक्यातील चोपडा सहकारी साखर कारखाना अर्थात चोसाका सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या बंद असणारा चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. कारखान्याकडे बुलढाणा अर्बन बँकेचे एकूण ४७ कोटी घेणे आहेत. परंतू ४७ कोटी रुपये आज चोसाकाला भरणे शक्य नाही. ती रक्कम कमी होऊन एकरकमी कमीत कमी कशी भरता येईल यासाठी सर्व संचालक मंडळ व सर्वपक्षीय नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, भाजप नेते घनश्याम अग्रवाल, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे चंद्रहास गुजराथी, उद्योजक सुनील जैन हे सातत्याने प्रयत्न करत होते.
दरम्यान, बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक चेअरमन राधेश्याम चांडक हे काल चोपड्यात आले होते. त्यांनी कारखान्यावरील एकूण ४७ कोटी कर्जापोटी एकरकमी २७ कोटी रुपयांत सेटलमेंट करण्याचा निर्णय, सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर केला, अशी माहिती चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यामुळे चोसाका सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या काढणे आणि कागदपत्रे जमवण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, असे अतुल ठाकरे यांनी सांगितले. यावेळी व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, संचालक आनंदराव रायसिंग, प्रवीण गुजराथी, सुनील महाजन,,प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.