चोपडा प्रतिनिधी । वीज ग्राहकांना महिन्यानुसार वीज बिल द्यावे. अन्यथा २७ जुलै रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आज तालुक्यातील ग्राहकांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला.
तालुक्यात कोरोना च्या पार्श्वभूमीवर तीन महिने लॉकडाऊन असल्याने महावितरण तर्फे घरोघरी जाऊन मीटर रीडिंग न घेता ग्राहकांना सरासरी वीज बिल देण्यात आलेले आहे. मात्र हे बिल पाचपट असल्याने अनेक वीज ग्राहकांकडून महावितरणकडे तक्रारी करण्यात येत आहेत. परंतु महावितरणचे अधिकारी व कर्मचारी या तक्रारींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून.. जे बिल दिले आहे, ते भरावेच लागेल.. असे सांगून तक्रारींचे निवारण न करता ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा भुर्दंड देऊन एक प्रकारे लूट करीत आहेत.
याबाबत इतर तालुका व जिल्ह्यात महावितरण तर्फे आठवडाभरापासून तक्रार निवारण शिबिरे घेण्यात येत आहेत. परंतु चोपडा तालुक्यात अजूनही वीज ग्राहकांचे शंका, समाधानासाठी संबंधित विभागामार्फत उपाययोजना होताना दिसत नाहीत. म्हणूनच लॉकडावऊन काळातील वाढीव वीज बिले रद्द होऊन फेब्रुवारी मार्च २०२० च्या बिला नुसार एप्रिल,मे,जून २०२० चे प्रत्येक महिन्याचे नविन विज बिल देण्यात यावे, अशी मागणी चोपडा तालुक्यातील वीज ग्राहकांतर्फे करण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभागाने येत्या आठ ते दहा दिवसांच्या आत जर वीजग्राहकांच्या वरील मागण्या मान्य केल्या नाहीत, तर चोपडा तालुक्यातील विजग्राहकांतर्फे दि. २७ जुलै सोमवार रोजी स.११ वा.तहसील कार्यालय चोपडा येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्यापुढील काळात न्याय मिळत नसेल तर पर्यायाने आमरण उपोषण करणे क्रमप्राप्त असेल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची असेल. हे करीत असताना लॉकडावून चे नियम पाळण्यात येतील. याबाबत तहसिलदार यांच्याशी सविस्तर चर्चा होऊन हा विषय वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले.
याबाबतचे निवेदन तहसीलदार,तहसील कार्यालय,चोपडा यांना देण्यात आले. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ टि.बाविस्कर, लखिचंद एस. बाविस्कर, मधुसूदन एल.बाविस्कर, सुभाष एस. शिरसाठ, भगवान कोळी, भगवान वैदु,नाना बाविस्कर, सतीश सोनार, मुरलीधर बाविस्कर, राजु सोनार, संजय सोनार, सुधाकर बाविस्कर, अशोक भाट, शेख रईम,शेख तौसिफा,संदिप पाटिल,नवल देवराज, रवींद्र सोळुंखे, मोतीलाल रायसिंग व सुरेंद्र सोनवणे यांच्या स्वाक्षर्या आहेत.