चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने एका मोठ्या सापळा कारवाईत सहायक अभियंता अमित दिलीप सुलक्षणे (वय 35) याला लाच घेताना रंगेहात पकडले असल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
हा प्रकार चोपडा शहरात घडला असून, आरोपी अमित दिलीप सुलक्षणेहा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, चोपडा शहर कक्षा 2 मध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने एका 23 वर्षीय तक्रारदाराच्या घरात नवीन वीज मीटर बसवण्यासाठी 5,500 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 4,500 रुपये ठरवण्यात आले. आज त्याला ही लाच स्वीकारताना पकडण्यात आले.
काल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, 12 मार्च 2025 रोजी सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
या कारवाईचे मार्गदर्शन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी केले, तर पर्यवेक्षण जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा आणि तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव यांनी जबाबदारी सांभाळली. सापळा पथकात पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पो. ना. मराठे आणि पो. ना. राकेश दुसाने यांचा समावेश होता.
आरोपीचे सक्षम अधिकारी म्हणून मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, जळगाव यांच्याकडे पुढील कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात येणार आहे.