चोपडा प्रतिनिधी । चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून मागील १० वर्षांपासून शहरात जलसंधारण, नाला खोलीकरण, नाला बांध दुरुस्ती व शेततळे निर्मितीची कामे केल्याची दखल घेत ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन, मीडिया एग्झिबिटर्स आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषीथॉन या स्पर्धेत बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्टला ‘आदर्श जलसंवर्धक पुरस्कार २०१९’ नुकतेच जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण २४ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे
दि चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टद्वारा मागील १०-१२ वर्षांपासून जलसंधारणासाठी तालुक्यातील नागलवाडी, वर्डी, मामलदे, हरेश्वर नाला चोपडा, सुंदरगढी, रामपूर, के.जी.एन कॉलनी व आडगाव रस्ता (चोपडा शहर) या विविध ठिकाणी पाणी आडवा – पाणी जिरवा ही मोहीम यशस्वीपणे राबवली गेली. राज्यात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी म्हटल्याप्रमाणे “जलाशये निर्मावी, मंदिरे उभारावी, ज्ञानमंदिर उघडावी हे तो छत्रपतींचे कार्यच”. याच उक्ती प्रमाणे दि चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टचे कार्य कुशल, कार्यतत्पर, दूरदर्शी, समाजाभिमुख व्यक्तिमत्व चंद्रहासभाई गुजराथी यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने जलसंधारणाचे अभियान यशस्वी करून दाखविले. या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषीविभागाच्या वतीने ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन, मीडिया एग्झिबिटर्स आणि महाराष्ट्र शासन कृषीविभाग याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषीथॉन या स्पर्धेत बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्टला आदर्श जलसंवर्धक पुरस्कार २०१९ जाहीर झाल्याचे नुकताच एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
चोपडा तालुक्यात मागील २ वर्षां पासून कमी झालेले पर्जन्यमान, पाणी टंचाई यामुळे भूजल पातळी आपला निच्चांक गाठत होती. यासाठी “जल है तो कल है” हि संकल्पना मना-मनात रुजवण्यासाठी कार्य सुरु केले. संस्थेच्या या प्रयत्नांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसानंतर सर्व नाले, शेततळे, बंधारे यात कोट्यवधी लिटर्स जलसंचय झाला. परिणामस्वरूप प्रकल्पाअंतर्गत पाण्याचा दुर्भिक्ष कमी होऊन संबंधित गावातील चाहुबाजूंना जलाशयात पाण्याचा साठा झाला. यामुळे गावातील कूपनलिकांमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली.
बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्टने केलेले असे राखीव रेखीव काम बघून परिसरातील जनता तसेच गावातील नागरिक मंत्रमुग्ध झाले. सुंदरगढीचा हा नाला गावात जलसंवर्धनासाठी आदर्श बनला. व याचे फलस्वरूप चंद्रहासभाई गुजराथी यांना गावातील विविध भागातील लोक ‘आमच्याही परिसरात अशी योजना राबवा’ असे आवाहन करू लागले व त्यास हवी ती मदत आम्ही करू अशी ग्वाही देऊ लागले.
हरेश्वर येथील नाला (नवर नदीपात्र, हरेश्वर मंदिराजवळ, के.जी.एन कॉलनी, आडगाव रस्ता) आता बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्टचे पाणी आडवा पाणी जिरवा ह्या उपक्रमाचे रूपांतर अभियानात झाले होते. शेततळे व नालाखोलीकरण या प्रकल्पांमुळे गाव पाणीदार झाले आहे. त्याचे समाधान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसून येते.
अश्या पद्धतीने चोपडा पीपल्स को ऑप बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून जलाशयाचे हे पुण्यकर्म झाल्याने प्रचंड विलंबाने मिळणारे गोड पाणी हे निदान ३-४ दिवसाआड मिळेल याची खात्री या कामाद्वारे झाली आहे. “पाणी आडवा – पाणी जिरवा ” या महत्वाकांक्षी योजनेचे जनक मा.अण्णा हजारे, मा.पोपटराव पवार, मा.विनायक पाटील, जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती अशोक जैन आणि चंद्रहासभाई गुजराथी आहेत. मोरेश्वर देसाई (उपाध्यक्ष), प्रवीण गुजराथी (ट्रस्टी), आशिष गुजराथी (ट्रस्टी), वसंत गुजराथी(ट्रस्टी), प्रफुल्ल गुजराथी (ट्रस्टी), सुनील जैन (ट्रस्टी), विकास गुजराथी(ट्रस्टी), राजेश सराफ (ट्रस्टी), शिरीष गुजराथी (ट्रस्टी) या सर्व विश्वस्तांचे अमूल्य सहकार्य लाभले.